बीड : शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास वासनवाडी परिसरात शेतीच्या वादावरुन झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी अॅड. कल्पेश पवने याला रविवारी न्यायालयाने ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर सोमवारी किसन पवने व डॉ. सचिन पवणे या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही ३ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
( भावकीतील वादातून थरार; मोठ्या भावाने शेतीच्या वादातून ३ सख्ख्या भावांना संपवले )
बीड शहराजवळील वासनवाडी येथे शनिवारी एकाच कुटुंबातील दिलीप, किरण आणि प्रकाश या तीन भावांचा त्यांचा सख्खा भाऊ किसन पवने आणि त्याची दोन मुले कल्पेश व सचिन यांनी निर्र्घृण हत्या केली. त्यानंतर पवने यांचा मुलगा किशोर याच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.दरम्यान, डॉ. सचिन व किसन पवने हे रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयासमोर हजर केले. यावेळी त्यांना देखील ३ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.