लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराजवळील वासनवाडी शिवारात २७ जुलै रोजी प्रकाश, दिलीप व किरण पवने या तीन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात किसन पवने, डॉ.सचिन पवने व अॅड. कल्पेश पवने यांना अटक झाली आहे. त्यांना न्यायालयाने ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी दोन्ही कुटुंबियांचे वेगळे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले.२७ जुलै रोजी वासनवाडी शिवारात १२ एकर शेतीच्या वादातून तीन सख्ख्या भावांची त्यांच्याच मोठ्या भावाने व पुतण्याने निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात पोलिसांकडून विविध दिशेने तपास केला जात असून, संबंधितांची कसून चौकशी केली जात आहे.शेतीचा वाद मागील २० वर्षापासून सुरु होता. तसेच हा वाद न्यायप्रविष्ट होता. त्यामुळे खून होण्यापुर्वी दोन्ही कुटुंबात कशा प्रकारचे वातावरण होते, एवढ्या टोकाचे वाद होतील, अशी परिस्थिती होती का, याविषयी माहिती व जवाब नोंदवण्यासाठी मंगळवारी दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांचे जवाब पोलिसांनी नोंदविले. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.दरम्यान, पोलीस कोठडीमध्ये असलेले किसन, कल्पेश, सचिन यांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच खून झाला त्यावेळी परिसरातील शेतात काम करणारे कोणी होते का? याचा देखील शोध घेतला जात आहे. यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करुन मोबाईल लोकेशन व संबंधित यंत्रणेचा आधार तपासासाठी घेतला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, खूनासाठी वापरण्यात आलेली हत्यारे विहिरीत टाकली होती, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता, ती हत्यारे पोलिसांना सापडले असून, सबळ पुरावे मिळवण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.पवने कुटुंबियांना मदतीची गरजखून झालेल्या प्रकाश पवने, दिलीप पवने व किरण पवणे यांची परिस्थिती बेताची होती. त्यांच्या कुटुंबाचा आधार ते होते. त्यांचीच हत्या झाल्यामुळे तिन्ही कुटुंबाचा आधार संपला आहे. सर्वबाजूने कुटुंब अडचणीत आहे, त्यांना मदतीची आवश्यकता असून, विविध सामाजिक संघटनांनी व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.‘मास्टरमार्इंड असण्याची शक्यता’डोळ््यात मिर्ची पावडर टाकून व धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे तिघांची हत्या केली होती. यामध्ये आणखी आरोपी असल्याचा संशय पोलिसांना असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत, तसेच एवढ्या टोकाचे पाऊल मारेकऱ्यांनी का उचलले,त्यामागे कोणी मास्टरमाइंड आहे का त्याचा शोध देखील घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
तिहेरी खून: फिर्यादी, आरोपी पक्षांचे जबाब नोंदवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:12 AM