बीड : शहरातील पेठ भागात गल्ली-बोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते. तसेच अपघाताचा धोका संभवतो. या गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होत असली तरी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे.
मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही कोरोनासदृश स्थिती असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त फिरत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा व दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठडयांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्युज, तार व हे बॉक्स उघडेच असतात.
पुलांना कठडे बसविण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे पुलाचे कठडे गायब झाले आहेत. यापूर्वीही कठडे नसलेल्या पुलावर अनेक वाहनचालक पडलेले आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुलांना कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
गॅस सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक
अंबाजोगाई : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते. हा प्रकार सातत्याने सुरू आहे. हे सिलिंडर दुचाकी किंवा ऑटोद्वारे इतरत्र नेऊन विकली जातात. पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्यावतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपांवर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे; मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरूस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरूस्त हातपंप दुरुस्तीची मागणी होत आहे.