बीड : तालुक्यातील सात्रा - पोत्रा, जेबापिंप्री येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नाल्या तुंबल्याने त्रास
बीड : तालुक्यातील चौसाळा येथे नाल्या तुंबलेल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावर येऊन चिखल तयार होत आहे. तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतकडे वेळोवेळी मागणी करूनही तुंबलेल्या नाल्या स्वच्छ केल्या जात नाहीत. त्यामुळे समस्या जैसे थे च आहे.
वाहने घसरू लागली
पाटोदा : तालुक्यातील शंभरचिरा, रोहतवाडी, नायगाव मार्गे असलेल्या बीड ते पाटोदा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुरवस्थेने वाहने घसरत असल्याने अपघातही वाढू लागले आहेत. रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.
रुंदीकरणाची मागणी
बीड : जिल्ह्यातील महत्त्वाचे नदीपात्र सोडल्यास इतर उपनद्यांचे पात्र हे ओढ्यासारखे झाले आहे. बेसुमार हेात असलेला वाळू उपसा व बाजूच्या शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण यामुळे नदीपात्र वरचेवर लहान होत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष घालून नदी रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता मोहीम राबवा
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
धारूर घाटात कठडे तात्काळ उभारावे
धारूर : धारूर ते तेलगाव रस्त्यावरील धारूर घाटात दरीच्या बाजूने कठडे उभारावे. कठड्याची उंची रस्त्याच्या बरोबरीने झाल्याने व अनेक ठिकाणी कठडे पडल्याने वाहन चालकांत भीती निर्माण होत आहे. प्रवाशांना घाटातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ या कठड्याची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.