शिरूर कासार : रक्कम असलेली तिजारी गॅस कटरने न जळाल्याने हाताश झालेले चोरटे रिकाम्या हाताने परतले. यामुळे बँकेतील १६ लाख ४७ हजार रूपयांची रक्कम सुरक्षित राहिली. ही घटना तालुक्यातील खालापुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शुक्रवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, तीन दिवसांपासून वीज नसल्याने बँकेतील सायरणही बंद होते. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.
खालापुरी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. दोन दिवसांपासून बँक कर्मचाºयांचा संप सुरू आहे. त्यामुळे बँकेकडे कोणी फिरकलेच नाहीत. त्यात खालापुरी परिसरात तीन दिवसांपासून विज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे सर्वत्र अंधार आहे. वीज नसल्याने बँकेतील युनव्हर्टरही बंद आहे. हीच संधी साधून शुक्रवारी मध्यरात्री चोरटे शटरचे कुलूप जाळून आत शिरले. त्यानंतर ते तिजोरीजवळ पोहचले. परंतु तिजोरी मजबूत असल्याने त्यांना तिचे कुलूप तुटले नाही. गॅस कटरनेही त्यांनी तिजोरी जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी हाताश होऊन चोरटे निघून गेले. शनिवारी सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती शिरूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांना दिली. ते चमुसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकानेही भेट देऊन बँकेची पाहणी केली. दरम्यान, तिजोरी न तुटल्याने आतील १६ लाख ४७ हजार रूपयांची रोख रक्कम सुरक्षित राहिली. यामुळे बँक अधिकाºयांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. शाखाधिकारी चंद्रकांत धसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बँक प्रशासन गाफीलबँकेच्या व ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी बँक प्रशासनाकडून लावण्यात येणारी सीसीटीव्ही कॅमेºयांची सुविधा या शाखेत नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा गलथान कारभार या घटनेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.सुरक्षेच्या बाबतीत बँक प्रशासनच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. यावरून बँक प्रशासन सुरक्षिततेच्या दृष्टीने किती जागरूक आहे, याची प्रचिती येते. नागरिकांमधून बँक प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.