ऑनलाईन लोकमत
बीड/माजलगाव, दि. २७ : हमीभाव जाहीर झाल्यानंतरही त्यास न जुमानत कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य शासनाने चौकशी सुरु केली आहे. यावर सुरुवातीस डोळेझाक केलेल्या कृषिउत्पन्न बाजार समितीने आता कारवाईची बडगा उगारला आहे.या कारवाईच्या भीतीने व्यापा-यांनी तूर खरेदी बंद केली आहे. यामुळे जवळपास ३०० पोते तूर पडून आहे.
शासनाने यावर्षी तुरीचा हमीभाव हा 5 हजार 50 रुपये असा जाहीर केला आहे. माजलगाव येथील व्यापारी मात्र हा हमीभाव जाहीर होण्याआधी व नंतरही तुरीस 4 हजारांपेक्षाही कमी भाव देत असत. या बाबत शासनाकडे तक्रारी गेल्यानंतर शासनाने नाफेड आणि फेडरेशन यांच्या मार्फत शासकिय तुर खरेदीला सुरुवात केली. शासकीय तूर खरेदी चालू असताना काही व्यापा-यांनी अडचणीत असलेल्या शेतक-यांची तूर विविध युक्त्या लढवून कमी भावात खरेदी केली. यानंतर त्यांनी हीच तूर ज्यादा भावाने खरेदी केंद्रावर विकली व मोठ्या प्रमाणात नफा कमावला.
या बाबत तक्रार दाखल होताच अशा काही व्यापा-यांची राज्य शासनाकडून सध्या चौकशी चालू आहे. व्यापा-यांनी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 11 हजार 815 क्विंटल तुर खरेदी केली. या तुरीस 3 हजार 700 ते 4 हजार 175 इतका भाव दिला. मार्च नंतर तुरीचे भाव पाडत व्यापा-यांनी 3 हजार ते 3 हजार 500 एवढा कमी भाव दिला. या कमी भावाच्या खरेदीच्या पावत्या बाजार समितीकडे जात असतानाही समितीने यावर कसलाच आक्षेप घेतला नाही.
व्यापा-यांकडुन खरेदी झालेल्या तुरीच्या या सर्व व्यवहाराची शासनाने माहिती मागवली आहे. यामुळे बाजार समिती आता खबडून जागी झाली व अशा व्यापा-यांवर कारवाई चा बडगा उगारत आहे. या कारवाईनंतर मात्र त्यांनी समितीत आलेली शिल्लक तूर खरेदी करण्यास नकार दिला आहे. शेतक-यांची जवळपास 300 क्विंटल तूर अजून पडून असून व्यापारी ही तूर खरेदी करण्यास नकार देत आहेत. व्यापा-यांवर काही कारवाई होणे दूरच पण तूर शिल्लक राहिल्याने शेतक-यांचे मात्र नुकसान होत आहे.
कोणावर होणार कारवाई व्यापारी खरेदी करीत असलेल्या तुरीच्या भावाची संपुर्ण माहिती ही बाजार समितीला माहित असते. तसेच दररोज कर्मचारी देखील मालाचे बिट चालु असतांना हजर असतात. मग शेतक-यांची एवढया मोठया प्रमाणात लुट चालु असतांना बाजार समितीचे कर्मचारी काय करीत होते ? आता व्यापा-यांवर कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. मात्र, खरेदीच्या वेळी बाजार समितीचे कर्मचारी देखील हजर असत यामुळे त्यांच्यावरहि कारवाई होणार का असा सवाल शेतकरी करत आहेत.
दोषींवर कारवाई करणार कमी भावाने तूर खरेदी बाबत शासनाच्या आदेशावरुन चौकशी सुरु आहे. यात कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. यासोबतच बाजारातील विक्री न झालेल्या तुरी बाबत लवकरच तोडगा काढु. - अशोक डक, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगाव