बाजारतळाची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळाची दुरवस्था झाली असून, नागरिकांची, व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाजारतळ व्यवस्थित करण्याची मागणी चौसाळा येथील विशाल तोडकर, नवसेकर आदींनी केली.
माजलगावात भुरट्या चोरांचा वावर
माजलगाव : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाईप, वायर अशा कम्पाऊंडमधील वस्तूंच्या चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. शहरातील गजानननगर, शाहूनगर, मंगलनाथ कॉलनी, समता कॉलनी भागातील घराच्या कम्पाऊंडमधील साहित्याच्या सर्रास चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे.
अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणावे
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी होत आहे.
पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत भागातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड होते. दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. अनेक भागात काही पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पथदिवे दुरुस्तीची मागणी होत आहे.
दारू विक्री बंद करा
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे.