बीड : तूर पिकाचे शेंडे खुडण्यासाठी लागणारे श्रम कमी करण्याच्या हेतूने तसेच उत्पादन खर्च कमी व्हावा आणि मजुराला पर्याय म्हणून अल्प खर्चामध्ये घरच्या घरी शेंडे खुडण्याचे यंत्र तयार करण्याचे मार्गदर्शन व तयार केलेल्या यंत्राच्या साहाय्याने प्रत्यक्ष तूर पिकाचे शेंडे खुडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी येथे पोकराचे उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांच्या संकल्पनेतून हे यंत्र तयार करण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत श्रीपतरायवाडी येथे सोयाबीन, तूर या पिकांची शेतीशाळा घेण्यात आली. समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सोयाबीन पिकावरील बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावग्रस्त झाडांची निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाचे उपाय सुचविले. फवारणी करताना संरक्षण किटचा वापर करून दाखविण्यात आला. शेतीशाळा प्रशिक्षक दशरथ उबाळे यांनी घरच्या घरी प्लास्टिकच्या पोत्यापासून संरक्षण किट तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
सहज मिळते साहित्य
यंत्र तयार करण्यासाठी लहान विद्युत मोटर, कटर, पीव्हीसी पाईप, वायर हे साहित्य वापरून घरच्याच औषध फवारणी पंपाच्या बॅटरीचा वापर करून यंत्र चालविण्यात आले. तूर पिकाचे शेंडे योग्य वेळी खुडल्यास भरघोस प्रमाणात फांद्यांची वाढ होऊन उत्पन्नात मोठी वाढ होते. या यंत्राच्या साहाय्याने एका दिवसात एक व्यक्ती किमान दोन एकरांतील तुरीचे शेंडे खुडणी करू शकते.
प्रतियंत्र ९०० रुपयांची बचत
यंत्राऐवजी पारंपरिक पद्धतीने चार मजुरांकडून याच दोन एकर शेंडे खुडणीसाठी किमान १२०० ते १५०० रुपये खर्च येतो. बाजारामधून कंपनीमार्फत तयार केलेले यंत्र खरेदी केल्यास १२०० रुपये लागतात; परंतु कृषी विभागामार्फत तयार करून दाखविलेल्या यंत्रासाठी अवघा ३०० रुपये खर्च येतो. त्यामुळे एका शेतकऱ्याचे प्रतियंत्र ९०० रुपये वाचणार आहेत. त्यामुळे अशा यंत्राचा वापर करून आपले श्रम आणि पैसा वाचविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
200821\20_2_bed_7_20082021_14.jpg
शेतीशाळा