बीड/मुंबई - बीड जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणुकांपूर्वीच पंकजा मुंडेंनी आपला पराभव मान्य केल्याचं त्यांच्या ट्विट वरुन दिसून येतंय. पंकजा मुंडेंनी ट्विट करुन जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट असल्याचं सांगितलंय. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर पंकजा नाराज होत्या, अशा बातम्याही माध्यमात आल्या आहेत. तर, गोपीनाथ गडावरील गोपीनाथ मुडेंच्या जयंती कार्यक्रमातही त्यांची थोडीसी नाराजी दिसून आली होती. त्यामुळेच, त्यांचा सक्रीय सहभाग या निवडणुकीत दिसला नाही, अशी चर्चा आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी सभा होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास (महिला) प्रवर्गासाठी आहे. निकाल कळायला 13 जानेवारी उजाडणार आहे. आज शनिवारी मतदान होणार असले तरी कुणाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांची माळ पडली हे हायकोर्टाच्या आदेशामुळे 13 जानेवारीनंतरच कळणार आहे. मात्र, तत्पूर्वीच माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी भाजपाचा पराभव मान्य केल्याचं दिसून येतंय. ''राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली ..लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत,'' असे ट्विट पंकजा यांनी केलं आहे.
पंकजा मुंडे गेल्या अनेक दिवसांपासून भाजापात नाराज असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे बंधु धनंजय मुंडेंनीच पंकजा यांचा पराभव केला. त्यामुळे, जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांचा उत्फुर्त प्रतिसाद दिसला नाही. विशेष म्हणजे मतदानाच्यादिवशी त्या बीडमध्ये हजरही राहिल्या नाहीत. थेट अमेरिकेवरुन त्यांनी ट्विट करुन निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट केलीय.