- पुरुषोत्तम कारवा माजलगाव ( बीड): माजलगाव मतदार संघातील शरद पवार गटाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. माजलगावातील तीन मातब्बर उमेदवार माघार घेत नसल्यामुळे या तिघांच्या वादात आता एक नवीन चेहरा पुढे येऊ शकतो. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांचे नाव आघाडीवर असल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शरद पवार गटाकडून मतदार संघाबाहेर उमेदवार लादण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरल्यानंतर देखील शरद पवार गटाचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत.शुक्रवारी संध्याकाळी रमेश आडसकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. या उमेदवारीला खासदार बजरंग सोनवणे यांनी विरोध केल्यामुळे शनिवारी त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकली नाही. दुसरीकडे खा़ बजरंग सोनवणे हे मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी अडून बसलेले आहेत. तर आडसकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर अशोक डक हे शरद पवार यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अडून बसले आहेत.या तिघाच्या वादामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांचे शेवटच्या क्षणी नाव पुढे येऊ लागले आहे.
बाहेरचा उमेदवार कितपत मत घेणार?सारिका सोनवणे या केज मतदार संघातील असल्यामुळे शरद पवार यांच्याकडून त्यांची उमेदवारी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे झाल्यास प्रकाश सोळंके यांचा विजय निश्चित मानला जाऊ शकतो. शरद पवार गटाकडून रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना वादामध्ये त्यांचे नाव मागे पडले असल्याचे देखील बोलले जाऊ लागले आहे. रमेश आडसकर हे मागील पाच वर्षापासून माजलगाव मतदार संघात दिवसरात्र काम करताना दिसून आले. मागील निवडणुकीत त्यांचा थोड्या मताने पराभव झाल्यामुळे त्यांना सध्या मतदारसंघातून सहानुभूती दिसून येत आहे. त्यांना तिकीट न मिळाल्यास व सारिका सोनवणे यांना उमेदवारी दिल्यास शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव आजच पक्का मानला जाऊ शकतो .