शिरूरकासार : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत असलेल्या निराधार, विधवा, अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या विशेष साहाय्य योजनेतील जवळपास ८१४९ लाभार्थींच्या खात्यात २ कोटी ४१ लाख ६१ हजार २०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे निराधारांना लॉकडाऊनच्या काळात आधार मिळाला आहे.
निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व्याधीग्रस्तांना व निराधार विधवांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली. त्यानंतर ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा योजना सुरू करण्यात आली. सध्या कोरोना परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. सर्वांचीच परिस्थिती बिकट आहे. त्यात निराधारांची दयनीय अवस्था आहे. अशा परिस्थितीत निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळाले आहे. फेब्रुवारी ते मे असे चार महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले गेले आहे.
थकीत अनुदानासह चालू महिन्याचे अनुदान असे मिळून ४००० रुपये एका लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग झाले आहेत. काहींनी हे अनुदान उचललेदेखील आहे.
अनुदान खात्यात जमा झाले असले तरी अनुदान घेण्यासाठी बँकेत गर्दी करू नये. आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्रातून रक्कम काढावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे. लॉकडाऊन काळात निराधारांना आधार मिळाल्याने निराधारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
शिरूर कासार तालुका लाभार्थी
संजय गांधी निराधार योजना २६९७
श्रावणबाळ योजना ५४५२
एकूण ८१४९
----------------------