गेवराई : विक्रीसाठी आणलेल्या गावठी पिस्तूलसह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अन्य एक आरोपी फरार झाला. सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास गेवराई पोलीस ठाण्याचे सपोनि साबळे यांच्या नेतृत्वाखाली डी. बी. पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गेवराई ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ढोक वडगाव फाटा परिसरात काही व्यक्ती गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती गेवराई ठाण्यातील डी. बी. पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ढोक वडगाव फाटा परिसरात सापळा रचला. साई हॉटेल येथून गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीतील राहुल दादासाहेब सोळसकर (वय २२, रा. गढी), सय्यद अरबाज निजाम (वय २१ रा. गढी) या दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून एक गावठी रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतूस जप्त करत त्यांच्याविरोधात कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. यापैकी निष्पन्न असलेला दीपक राधाकिसन पवार रा. रांजनी हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लांजेवार, डीवायएसपी स्वप्निल राठोड, गेवराई ठाण्याचे प्रमुख पो. नि. रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकप्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे, पो. हे. कॉ. देशमुख, जायभाये, नागरे, पो. ना. शरद बहिरवाळ, नारायण खटाने आदींनी केली.