फोटो
गेवराई : विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पोने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावर बागपिंपळगाव कॅम्प परिसरात सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. बाबासाहेब सौंदलकर (५०) व गोरख लिंबाजी शेंडगे (४५) अशी मयतांची नावे असून ते तालुक्यातील रा. विठ्ठलनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
बाबासाहेब सौंदलकर व गोरख शेंडगे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच २३ व्ही ४७०६) वरून विठ्ठलनगरकडे (रेवकी) जात होते. दरम्यान, औरंगाबादहून गेवराईकडे महामार्गाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पोने (एमएच १२ केटी ९५००) धडक दिली. यात दुचाकीचा चक्काचूर झालाच, शिवाय दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. घटनेनंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. महामार्ग तसेच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही केली. या वेळी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.