बीड : क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पर्यावसान दोन भावंडांच्या खुनात झाले. कुऱ्हाडीचे घाव घालून दोन भावांना निर्घृणपणे संपविण्यात आले. ही खळबळजनक घटना १७ मे रोजी रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली.
राम साळुंके (वय ५०) व लक्ष्मण साळुंके (वय ४७) अशी या प्रकरणातील मयतांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके (वय २३) याच्यासोबत शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी हा वाद ग्रामपंचायत स्तरावर मिटवण्यात आला होता; परंतु सोमवारी परमेश्वर याने राम व लक्ष्मण साळुंके या दोघांना फोन करून झालेल्या भांडणाचे कारण काढून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला समजवण्यासाठी व शिवीगाळ केल्याचे परमेश्वर याच्या आई-वडिलांना सांगण्यासाठी सोमवारी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके गेले होते. दरम्यान, आपल्या घरी दोघे येणार असल्याची माहिती परमेश्वर याला होती. यादरम्यान हा वाद मिटवण्यासाठी नागापूर खुर्द येथील माजी सरपंच व या प्रकरणातील फिर्यादी विठ्ठल साळुंके यांना देखील बोलावण्यात आले होते.
परमेश्वर याने रागाच्या भरात राम व लक्ष्मण साळुंके यांचा खून करण्याच्या तयारीने कुऱ्हाड घेऊन त्याच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसला होता. राम व लक्ष्मण साळुंके दिसताच परमेश्वर साळुंके याने त्यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने घाव घातले. या हल्ल्यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. तोपर्यंत आरोपी परमेश्वर साळुंके त्याठिकाणावरून फरार झाला होता. ठाणेप्रमुख सपोनि शरद भुतेकर, पोउपनि ज्ञानेश्वर सानप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून माजी सरपंच व प्रत्यक्षदर्शी विठ्ठल साळुंके यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउनि ज्ञानेश्वर सानप करत आहेत.
कुटुंब पडले उघड्यावर
राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके हे दोघेही शेती करून कुटुंबाचा सांभाळ करत होते. मुलांचे शिक्षण देखील सुरू होते. मात्र, क्षुल्लक कारणावरून त्यांच्या मुलांच्या वयाचा असलेल्या आरोपी परमेश्वर याने खून केल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
अधिकारी रात्रभर ठाण मांडून
या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर व इतर अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून होते. आरोपीच्या शोधासाठी तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.