गेवराई : तालुक्यातील गुळज भगवाननगर येथे आपल्या नातेवाइकांच्या लग्नासाठी आलेल्या पैठण आणि रामपुरी येथील दोन शाळकरी मुलांचा पैठण उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यातील एकाचा मृतदेह बुधवारी रात्री उशिरा तर दुसऱ्याचा गुरुवारी दुपारी सापडला.
शेख अरबाज (१३, रा. पैठण, जि. औरंगाबाद) व शेख नसीर (१२, रा. रामपुरी, ता. गेवराई) अशी मृतांची नावे आहेत. दोघे कुटुंबीयांसमवेत गुळज येथील भगवाननगर येथे नातेवाइकांकडे लग्नासाठी आले होते. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी दोघे कालव्यात उतरले. मात्र सध्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने व पोहता येत नसल्याने हे दोघे पाण्यात बुडाले आणि वाहून गेले. ही माहिती समजल्यानंतर नातेवाईक व शोध पथकाने त्यांचा शोध सुरू केला. बुधवारी रात्री १० च्या सुमारास शेख अरबाज याचा मृतदेह कालव्यात सापडला, तर शेख नसीर याचा मृतदेह गुरुवारी दुपारी काही अंतरावर सापडला.