बीड : चोरी झाली म्हणून गाव गोळा केले. पोलिसांनाही बोलावले. अख्खं कुटुंब परेशान झालं. महिला फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यातही आली. त्यानंतर ती घरी गेली अन् चोरी गेलेले सोने सापडल्याचे पोलिसांना कळवले. हा चोरीचा बनाव असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर दोनच तासात पोलिसांनी या प्रकाराचा छडा लावला.
बीड शहरातील बोबडेश्वर गल्ली भागात सुरेश (नाव बदलले आहे) यांचे घर आहे. सुरेशसह त्यांचे आई-वडील द्वारका येथे यात्रेला गेले आहेत. सुरेश यांचे मोठे बंधू प्राध्यापक असल्याने ते महाविद्यालयात गेले होते. घरी केवळ सुरेश यांची पत्नी सुनिता (नाव बदलले आहे) या होत्या. त्या शहरातीलच एका शाळेत शिक्षिका आहेत. सकाळी ९ वाजता त्या घराबाहेर पडल्या. तीन वाजता घरी परतल्या. यावेळी त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. बाजूलाच असणा-या एका मुलाला त्यांनी भिंतीवरुन आत जाण्यास सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याची माहिती इतरांना दिली.
पोलिसांनाही तात्काळ पाचारण केले. उपअधीक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखा पो. नि. घनश्याम पाळवदे, शहर ठाण्याचे पो. नि. सय्यद सुलेमान, द. प्र. शा. चे स.पो. नि. श्रीकांत उबाळे, फौजदार दिपाली गित्ते यांनी तात्काळ धाव घेत तपास सुरु केला. दोन मुलांना तपासासाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक ‘क्ल्यू’ मिळाला. त्याआधारेच त्यांनी हा प्रकार म्हणजे चोरीचा बनाव असल्याचा अंदाज बांधला. यामध्ये सुनिताने पोलिसांना सोने सापडल्याचे सांगितले. रोख रक्कम शोधणे सुरु आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी ही कारवाई केली.
रोख ६ लाख रुपयांसह दागिने चोरीची माहिती ?आपल्या घरातून रोख ६ लाख रुपये व दागिन्यांची चोरी झाल्याचे सुनिताने पोलिसांना सांगितले. यात सासूचे दागिने चोरीस गेले असून, सुनिताचे जागेवरच होते. त्यामुळे संशय बळावला. यावरुनच पोलिसांनी तपास सुरु केला अन् दोन तासात सोने हस्तगत करुन प्रकरण तडीस नेले.