गेवराई (जि. बीड) : अवैध गर्भपातप्रकरणात आरोपी असतानाही पुन्हा जामिनावर बाहेर येताच दोघांनी गर्भलिंग निदान करण्याचा बाजार मांडला होता. पोलिस व आरोग्य विभागाने गुरुवारी कारवाई करत मनीषा शिवाजी सानप व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव यांना ताब्यात घेतले होते. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी दोघांनाही न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच फरार डॉक्टरच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.
दीड वर्षापूर्वी अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेल्या जालन्याच्या डॉक्टरसह गेवराईच्या बडतर्फ झालेल्या अंगणवाडी सेविकेने जामिनावर बाहेर येताच पुन्हा अवैध गर्भलिंग निदान करणे सुरू केले. याची माहिती अज्ञात व्यक्तीने टोल फ्री क्रमांकावरून प्रशासनाला दिली. त्यावरून पोलिस व आरोग्य विभागाने कारवाईसाठी सापळा लावला. एका गर्भवती महिला पोलिसाला रुग्ण बनवून तपासणीला पाठविण्यात आले. तपासणीला सुरुवात करताच यातील अंगणवाडी सेविका आणि घरमालकाला ताब्यात घेण्यात आले.