बीड : ट्रक आणि दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार तर दोघे जखमी झाले. पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या मोटारसायकलला ट्रकने डाव्या बाजूने धक्का दिल्याने घसरलेल्या दुचाकीवरील युवकाच्या डोक्यावरुन ट्रकचे पाठीमागचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला, तर दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी केज शहरातील मुख्य रस्त्यावर घडली.परभणी जिल्ह्यातील मंडसगाव (ता. गंगाखेड) येथील मजूर केज तालुक्यातील बजरंग सोनवणे यांच्या खडी क्रेशरवर कामास आहेत. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास विलास रावसाहेब मोरे व प्रकाश पिराजी कोमटे (वय २६) हे दोघे दुचाकी (एमएच २६ बीएम १४३३) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात होते. पाठीमागून आलेल्या ट्रकला (एमएच १६ एवाय ५८५९) बाजू दिली. मात्र, ट्रक चालकाने मोटारसायकलला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून डाव्या बाजूने दुचाकीस धक्का दिला. या धक्क्याने दुचाकी घसरुन पडल्याने दुचाकीवरील प्रकाश कोमटे हा ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आला. त्याच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला तर दुचाकी चालवत असलेला विलास मोरे हा रस्त्यावर पडल्याने जखमी झाला.या प्रकरणी विलास रावसाहेब मोरे याच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक ईश्वर बबन आदाटे (रा. पिंपळा धायगुडा ता. अंबाजोगाई) याच्याविरुद्ध केज येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रकाश कोमटे याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली आहेत.
ट्रक- दुचाकीच्या अपघातांमध्ये दोन ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:25 AM