केज : येथील सामाजिक कार्यकर्तीच्या कारला दुचाकी आडवी लावून चाकूचा धाक दाखवत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी (दि. ७) सायंकाळी कोरेगाव पाटीजवळ घडला. यावरून तिघांवर खंडणीचा गुन्हा नोंद झाला.
नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेच्या सचिव मनीषा सीताराम घुले या ज्योती साखरे व कौशल्या थोरात या सहकाऱ्यांसोबत कारमधून (एमएच ४४ यू- ०४८६) ७ रोजी मस्साजोग येथून केजकडे बचत गटांच्या रेकॉर्डची तपासणी करून परतत होत्या. कोरेगाव पाटीजवळ सायंकाळी सव्वासहा वाजता श्रीराम तुकाराम तांदळे व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकल त्यांच्या कारच्या आडवी लावली. यावेळी श्रीराम तुकाराम तांदळे याने चाकूचा धाक दाखवत मनीषा घुले यांना ‘तू मला कोर्टातून नोटीस का पाठवलीस?’ असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच ‘तुझ्या संस्थेचा हिशेब दे, नाही तर दोन लाख रुपये दे,’ असे म्हणत खंडणी मागितली. त्यावेळी मनीषा घुले यानी शिवीगाळ करू नका. माझा संस्थेशी संबंध नाही,’ असे म्हणाल्या असता श्रीराम तांदळे व अन्य दोघांनी मनीषा घुले, त्यांच्या सोबतच्या महिला व गाडीचा चालक रवींद्र घुले यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आरडाओरड करताच तिघेही मोटारसायकलवर बसून पसार झाले.
८ सप्टेंबर रोजी केज येथील ठाण्यात गुन्हा नोंद झाला. जमादार धनपाल लोखंडे तपास आहेत.