....
मजुरीचे पैसे मागणाऱ्या वृद्ध मजुरावर हल्ला
केज : झेंडूलागवड तसेच खुरपणीच्या कामाचे पैसे मागणारे वृद्ध मजूर धनराज बाबू होनमणे (६०, रा. जिवाचीवाडी, ता. केज) यांना मारहाण करून कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी जिवाचीवाडी शिवारातील शेतात घडली. त्यानंतर जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. मुजू नईम इनामदार (रा. रोजा मोहल्ला, केज) याच्यावर केज ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
...
रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा
माजलगाव : शहरातील फुलेनगरात ऐन रस्त्यावर घराचे बांधकाम करणाऱ्यावर पालिका प्रशासनाने १ सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला. शेख खलील शेख शमशोद्दीन, असे आरोपीचे नाव आहे. त्याचे फुलेनगरात रस्त्याच्या कडेला घर आहे. त्याने रस्त्याची जागा ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम सुरू केल्याचे २५ ऑगस्ट रोजी समोर आले. सहायक नगररचनाकार प्रकाश शिंदे यांनी त्यास नोटीस बजावली; पण त्याने नोटीसला दाद दिली नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शहर ठाण्यात शिंदे यांच्या तक्रारीवरून कलम ४४८ व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
...
चुगली करतो म्हणून तरुणाचे डोके फोडले
अंबाजोगाई : अस्वलअंबा (ता. परळी) येथे चुगली का करतो, असे म्हणत संतोष तुकाराम जाधव (३२) यास दगड फेकून मारून डोके फोडले. १ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात गावातीलच राजाभाऊ विठ्ठल राठोडवर गुन्हा नोंद करण्यात आला.
....
केज, अंबाजोगाईत घरफोडी, ऐवज लंपास
बीड : जिल्ह्यात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना २ सप्टेंबर रोजी उघडकीस आल्या. शिंदी (ता. केज) व अंबाजोगाई येथे या घटना घडल्या.
अंबाजोगाईतील समतानगरातील नामदेव एकनाथ कांबळे हे बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत २४ ते ३१ ऑगस्टदरम्यान चोरांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत विक्रीसाठी ठेवलेले ६० हजार ४०० रुपये किमतीचे महिलांचे नवे कोरे कपडे लंपास केले. शहर ठाण्यात १ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. दुसऱ्या घटनेत शिंदी (ता. केज) येथे विजयाबाई किसन अहिरे या घरात झोपलेल्या असताना मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी आत प्रवेश करत ३० हजार किमतीचे दागिने लंपास केले. २९ ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली. १ सप्टेंबर रोजी केज ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
....