अंबाजोगाई (बीड ) : विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे आकर्षक वायाजाचे आमिष दाखवून दोन ठेवीदारांचे मुदत ठेवीच्या स्वरूपातील एकूण साडेआठ लाखांची रक्कम हडप केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांना लुबाडल्या प्रकरणी ‘शुभकल्याण’वर यापूर्वीच जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत. अद्यापही गुन्हे दाखल करण्याचे सत्र थांबलेच नसून फसवणुकीची आणखी प्रकरणे समोर येत आहेत. शुभकल्याण द्वारा विविध प्रसार माध्यमातून करण्यात आलेल्या आकर्षक व्याजदराच्या जाहिरातीला भुलून अंकुश सोपानराव जोगडे यांनी ५ लाख ७ हजार १०२ रुपयांच्या तर संतोष रामराव पौळ (दोघेही रा. पंचायत समिती पाठीमागे, अंबाजोगाई) यांनी ३ लाख ६३ हजार २१७ रुपयांची रक्कम ठेवींच्या स्वरुपात शुभकल्याण मध्ये गुंतवली होती. परंतु, मुदत उलटूनही त्यांना ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली. त्यानंतर मल्टीस्टेटच्या व्यवस्थापकाने बँक बंद पडली असून तुम्हाला काय कार्याचे ते करून घ्या असे म्हणून हात वर केले. त्यामुळे दोन्ही ठेवीदारांनी अंबाजोगाई शहर पोलिसात धाव घेतली.
परंतु, कथित राजकीय दबावापोटी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाच्या आदेशानुसार अंकुश सोपानराव जोगडे आणि संतोष रामराव पौळ यांच्या दोन वेगवेगळ्या फिर्यादींवरून शुभकल्याण मल्टीस्टेटचा अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट, अजय दिलीप आपेट, विजय दिलीप आपेट, अभिजीत दिलीप आपेट, भास्कर बरजंग शिंदे, नागीणीबाई बजरंग शिंदे, कमलबाई बाबासाहेब नखाते, शालिनी दिलीप आपेट, आशा रामराव बिराजदार, प्रतिभा आप्पासाहेब आंधळे, बापुराव ज्ञानोबा सोनकांबळे आणि अंबाजोगाई शाखेचा व्यवस्थापक विठ्ठल दगडुबा काळे यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.