माजलगाव (बीड ) : येथील खुद्द तहसीलदारांच्याच घरावर तब्बल एक महिन्यापासून रात्री निगराणी करणाऱ्या दोघाजणांना पोलिसांनी बुधवारी (दि.१९ ) पहाटे ताब्यात घेतले आहे. अटकेतील दोघेही वाळू वाहतूकदार असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यात वाळूचे ठेके शासनाने अद्यापही सुरु केले नसल्याने गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा दररोज सुरुच आहे.मात्र काही दिवसांपूर्वी पासून येथे तहसीलदार म्हणून डॉ प्रतिभा गोरे यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई सुरू केल्याने अशा माफीयांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस खाते कमी पडत असताना तहसीलदार गोरे या रात्री उशिरा माहिती मिळताच थेट रस्त्यावर उतरून किंवा नदी पात्रात जाऊन वाळूची वाहने पकडत आहेत. त्यामुळे वाळू माफियांनी नवी शक्कल लढवली व थेट तहसीलदार गोरे यांच्या पाळतीवर माणसे ठेवली, कोर्ट रोडवर असलेल्या तहसीलदार निवासस्थानी मागील एक महिन्यापासून काही तरुण पाळत ठेवत असल्याचा गोरे यांना संशय आल्याने त्यांनी याची खात्री करून घेतली व बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी यांना पाचारण केले.
पोलिसांनी तहसीलदार निवासस्थानासमोर असलेल्या नगर परिषद इमारतीवर दबा धरून बसलेले सुहास जगन्नाथ लंगडे रा.खापरवाडी व तुषार भारत माने रा.शिंदेवाडी या दोघांना अटक केली.वरील दोघेही आरोपीकडे वाळू टिप्पर असल्याने ते नदी पात्रातून गाड्या बाहेर काढण्यासाठी पाळत ठेवत असल्याची माहिती तहसीलदार गोरे यांनी दिली. दरम्यान आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान यापूर्वी 28 मे रोजी तीन जणांना केसापुरी कॅम्प येथे निगराणी करताना अटक केली होती. महसूल पथक व तहसीलदार यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी वाळू माफियांनी आपल्या खबऱ्यांचे नेटवर्क तयार केले असल्याचे आढळुन येत आहे.