- संजय खाकरे
परळी : तालुक्यातील दाऊतपुर येथील नविन परळी औष्णिक विद्युत केंद्र (थर्मल ) मध्ये 250 मे.वॅ. क्षमतेचे प्रत्येकी संच क्र. 6,7 व 8 हे तीन संच आहेत, एम.ओ.डी. रेट मध्ये बसत नसल्याच्या कारणावरून 250 मे.वॅ. क्षमतेचे संच क्र. 6 व 7 हे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी संच क्र. 8 हा एकमेव संच चालू होता या संचातून 13 मार्च रोजी दुपारी 1 च्या दरम्यान 250 मे.वॅ. एवढी विज निर्मिती चालू होती.
येथील नवीन परळी औष्णिक केंद्रात 250 मेगावॅट क्षमतेचे तीन संच असून या तीन संचाची स्थापित क्षमता 750 मेगावॉट एवढी आहे. नविन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.6 हा 12 मार्च रोजी तर संच क्र. 7 हा 9 मार्च रोजी बंद ठेवण्यात आला. शुक्रवारी केवळ संच क्र. 8 हाच चालू होता. नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 3 संचापैकी 2 संच बंद ठेवण्यात आल्याने 500 मे.वॅ.विजेची तुट जाणवली. महाजनकोच्या आदेशानुसार हे दोन संच नविन परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासनाने बंद ठेवले आहेत. मिरीट ऑर्डर डिस्पॅच रेट मध्ये बसत नसल्यामुळे परळीचे दोन संच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेंव्हा विजेची मागणी वाढेल तेंव्हा हे दोन संच सुरू करण्यात येणार असल्याचे येथील स्थानिक अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
परळीला वीजनिर्मितीसाठी खाणीतून दगडी कोळसा आणण्यासाठी ज्यादा अंतर लागत आहे त्यामुळे येथील विजेच्या खर्चाचा दर वाढत आहे. हे लक्षात घेवून संच बंदचा निर्णय लागू केले जात आहे. यातून एम.ओ.डी. रेटच्या निकषातून परळी औष्णिक विद्युत केंद्राला वगळावे व संच बंद ठेवण्यात येवू नये अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांनी या पूर्वी ऊर्जा विभागा कडे केली आहे. संच बंदच्या निर्णयामुळे महाजनकोचे मोठे नुकसान होत आहे व परळीच्या बाजारपेठेवरही परिणाम होत आहे असे मतही चेतन सौंदळे यांनी व्यक्त केले.