संपूर्ण तालुका हादरवणारी घटना शिरूरमध्ये २० मे रोजी सायंकाळी आठ साडेआठच्या दरम्यान घडली. विशाल कुलथे या २५ वर्षीय सराफ व्यावसायिकाचा सलूनच्या दुकानात बोलावून खून केला होता. त्याच्याजवळ सोन्याचे दागिने आहेत, अशी खात्री करून अगदी निर्दयीपणे मानेत कात्री खुपसून खून केला. आरोपी एवढ्यावर न थांबता त्या दोघांनी मृताला मोटारसायकलवर गोधडीत गुंडाळून थेट शेवगाव तालुक्यातील भाटकुडगाव येथे नेऊन आरोपीच्या चुलत्याच्या शेतात पुरून टाकले. यातील एकाला त्याच्या घरी सोडून दोघे परत शिरूरला आले. येताना ती गोधडी रस्त्यात जाळून टाकल्याचे निष्पन्न झाले. मृताचा मोबाईल मात्र अद्याप मिळून आलेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. एकही आरोपी अद्यापपर्यंत हाती लागलेला नाही.
दरम्यान, तपासकामी मदत व्हावी, म्हणून सात-आठ लोकांचे जबाब घेतले असल्याचे सांगण्यात आले. दोन पोलीस पथके मागावर असल्याचे सांगून त्याला अटक करण्यात लवकरच पोलिसांना यश येईल, असेही सांगितले गेले. वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या निर्दयी घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे; तर आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह सर्व स्तरांतून होत आहे. आता पोलीस त्या फरार आरोपीस कधी अटक करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.