बीड : जिल्ह्यात अंबाजोगाईनंतर बीडमध्ये मोबाईल व्हॅनमध्ये आरटीपीसीआर चाचण्या होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु मायलॅबच्या अनागोंदी कारभारामुळे या व्हॅनमध्ये तपासणीसाठी पाठविलेले जवळपास २ हजार अहवाल चार दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून रोष व्यक्त होत आहे. याच तक्रारींच्या अनुषंगाने आता जिल्ह्यातील स्वॅब पुन्हा अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता आणि चाचण्या वाढविण्याच्यादृष्टीने आयसीएमआरने एका मोबाईल व्हॅनमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देत बीडमध्ये आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात केली हाेती. अगोदर बीडमधील सर्व स्वॅब हे अंबाजोगाईच्या स्वाराती प्रयोगशाळेत पाठविले जात होते. परंतु आता ही सुविधा बीडमध्येच उपलब्ध केल्याने अहवाल लवकर मिळतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु १२ मेपासून या चाचण्यांना सुरुवात झाली असली तरी अद्याप लोकांना याचे अहवाल मिळालेले नाहीत. याबाबत लोकांनी आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, अहवाल आले नाहीत, असे उत्तर दिले जात आहे. तसेच आरोग्य विभागानेही या व्हॅनमधील प्रमुखांसह मायलॅबला विचारणा केली असता, तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जाते. या ढिसाळ कारभाराचा फटका सामान्यांना बसत आहे. एक तर लवकर सुधारणा करावी, अथवा पुन्हा अंबाजोगाईलाच स्वॅब पाठवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
१२ मेचे अहवाल अद्याप नाहीत
ज्या लोकांनी १२ मे रोजी स्वॅब दिला होता, त्यांचे अहवाल अद्यापही आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तब्बल चार दिवस उलटूनही अहवाल येत नसतील तर रुग्ण निष्पन्न कसा होणार, तोपर्यंत त्याला जास्त संसर्ग झाला तर जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे यात लवकर सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
माझ्याकडेही तक्रारी आल्या आहेत. याबाबत त्यांच्या वरिष्ठांना बोलत आहे. लवकरच सुधारणा होईल.
- डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
कोट
माय लॅबकडून अहवाल वेळेवर मिळत नसल्याने आपण जिल्ह्यातील सर्व स्वॅब पुन्हा अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवित आहोत. याबाबत माय लॅबच्या वरिष्ठांना कल्पना दिली आहे.
कोट
आमच्याकडून पुण्याच्या मुख्य कार्यालयात अहवाल पाठविलेले आहेत. मेसेज जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी आहेत. दोन-चार दिवसांत सुरळीत होईल. -
- नरेन शर्मा, प्रमुख, मोबाईल व्हॅन
===Photopath===
160521\16_2_bed_7_16052021_14.jpeg
===Caption===
याच व्हॅनमधून आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.