बीड : माजलगाव तालुक्यातील आडोळा येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी दोन टिप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ताब्यात घेतले. माजलगाव तालुक्यातील आडोळा येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाचे प्रमुख सपोनि विलास हजारे यांना मिळाली होती. त्यावरून पथकाने सोमवारी सायंकाळी ६ वाजता छापा टाकला. यावेळी दोन टिप्परमध्ये (क्र.एमएच ०४ ईवाय ५००२ व एमएच १७ एजी ४५४५) १० ब्रास वाळू मिळून आली. हा सर्व २२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी टिप्परचालक शेख नसीब शेख अजीज (रा.पिंपळगाव, ता.माजलगाव) व सलाम खालीद अन्सारी (रा.पाथरी, ता. परभणी) व दोन्ही वाहनांचे मालक या चौघांविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार बालाजी बास्टेवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अवैध वाळू उपसा जोमात सुरू असून, माजलगाव महसूल व पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
अवैध वाळू उपसा करणारे दोन टिप्पर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:55 AM