बीड : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातल सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या, नाल्या, ओढ्याला पाणी आले आहे. कपिलधार येथील धबधबा पाहण्यासाठी दुचाकीवरून दोन अल्पवयीन मुलं जात होे. यावेळी रस्त्यावर ओढ्याचे अचानक पाणी आल्याने दुचाकी स्लीप होऊन एकजण पाण्यात वाहून गेला तर, एकास ग्रामस्थांनी वाचवले आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
सर्वदूर चांगला पाऊस झाल्यामुळे पर्यटनस्थळांवर गर्दी होत आहे. दरम्यान बीड तालुक्यातील कपिलधार येथील धबधबा पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी होत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी बीड येथील ओंकार विभुते (वय १७ रा. माळीवेस बीड ) व यशराज कुडके (वय १७ रा.कबाडगल्ली बीड ) हे दोघे दुचाकीवरून कपिलधारकडे जात होते. यावेळी धबधब्याचे पाणी वाहून नेणाऱ्या ओढ्याचे पाणी अचानक वाढल्याने सिमेंट रोडवर अचानक पाणी आले व दुचाकी स्लीप झाली. त्यानंतर दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत ओंकार विभूते याला प्रवाहातून बाहेर काढले तर, त्याचा मित्र यशराज कुडके हा प्रवाहासोबत पाण्यात वाहून गेला. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाणे प्रमुख पोनि संतोष साबळे यांना मिळताच त्यांनी कर्मचारी बी.डी.मांडवे व बीट अंमलदार बी.पी.माने यांना घटनास्थळी पाठवले आहे. त्याठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे शोधकार्यात अडचण येत असल्याचे माने यांनी सांगितले. तर, ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम उशिरापर्यंत सुरु होती.
हेही वाचा - - माजलगाव धरणातून १ लाख क्युसेकने सोडले पाणी; सिंधफणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली- जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद- केंद्रेवाडी भूगर्भातील गूढ आवाजाने हादरली; ग्रामस्थांनी भीतीने रात्र जागून काढली