अंबाजोगाई : शहरातील रिंगरोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी एका बाजूने रस्ता उखडून व खाेदून ठेवला. मात्र रस्त्याचे काम केले नाही. परिणामी रस्त्यावर मोठी धूळ साठली आहे. याचा मोठा त्रास वाहनचालकांना होत आहे. या रस्त्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
थंडीतापाचे रुग्ण वाढले
अंबाजोगाई : तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन वेळा पाऊस पडला तर आता दररोज आभाळ भरून येते. त्यामुळे कधी ऊन तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे थंडीतापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे खासगी रुग्णालय हाउसफुल्ल होत असून, उपचार करून घेण्यासाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.
कर्जवसुली थांबविण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचतगटांना बँकांनी दिलेली कर्ज वसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी होत आहे.
पेट्रोल दरवाढीचा वाहनचालकांना भुर्दंड
बीड : पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून होत आहे.