- नितीन कांबळेकडा: मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्यासाठी चांगले अहवाल पाठवलेले आहेत. त्याच्याबदल्यात बक्षीस म्हणून पाच हजार रूपये लाच स्वीकारताना दोन महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्या. शुक्रवारी दुपारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी येथील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील एका गावात तक्रारदार महिलेची मिनी अंगणवाडी होती. ती शासनाच्या १० जानेवारी २०२४ च्या जीआर प्रमाणे वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली. मात्र, यासाठी तुमचे चांगले अहवाल पाठवलेले आहेत. त्यामुळे तुमचा पगार ६ हजारांवरून १० हजार रूपये झाला झाल्याने बक्षीस म्हणून पाच हजार रूपये द्या, अशी मागणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पच्या पर्यवेक्षिका अमृता श्रीकांत हाट्टे आणि कनिष्ठ सहायक निता रामदास मलदोडे यांनी केली.
याबाबत अंगणवाडी सेविकेने ३० जुलै रोजी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ( दि. २) दुपारी आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा लावला. यावेळी तक्रारदारांकडून पर्यवेक्षिका अमृता हाट्टे आणि कनिष्ठ सहायक निता मलदोडे या दोघींना ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पडले. लाचखोर दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागबीडचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे,पथक प्रमुख श्रीराम गिराम,संतोष राठोड,अमोल खरसाडे,अंबादास पुरी यानी केली.