केज : अंबाजोगाई येथे लग्नासाठी बाईकवर जात असलेल्या दोन २० वर्षीय युवकांचा जीपसोबत झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. दोन्ही युवक होळ येथील रहिवासी असून हा अपघात सोमवारी सकाळी १०. ३० वाजेच्या दरम्यान होळजवळ अंबाजोगाई रोडवर झाला. अजिंक्य दत्ता धस (वय २०), महेंद्र भीमराव घुगे (वय २०, दोघेही रा.होळ ता.केज) अशी मृतांची नावे आहेत.
केज तालुक्यातील होळ येथील अजिंक्य दत्ता धस आणि महेंद्र भीमराव घुगे हे सोमवारी सकाळी बाईकवर अंबाजोगाईकडे एका लग्नासाठी जात होते. घर सोडून शहराबाहेर दोन किलोमीटर अंतर पार करताच समोरून येणाऱ्या एका भरधाव जीपने (क्र.एम.एच.२४ व्ही ४४८९) त्यांच्या बाईकला समोरासमोर धडक दिली. यात अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला होता. तर महेंद्र घुगे हा गंभीर जखमी झाला. प्रवास्यांनी त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनास्थळी युसुफवडगाव पोलीसानी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.