ऑनलाईन लोकमत
माजलगाव (जि.बीड), दि. ३० : राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते तिन महिन्यांपूर्वी शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन झाले. परंतु; अजूनही हे कार्यालय वापराविना धुळखात पडुन आहे.
शहरालगत केसापुरी रोडवर ग्रामीण पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पोलीस वसाहतींचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारती सर्व सोयीनी सुज्ज आहेत. यामुळे उदघाटनानंतर एक महिन्यातच ग्रामिण पोलीस ठाण्याचे येथे स्थलांतर झाले. सुसज्ज अशा या इमारतीमध्ये ग्रामीण पोलीस ठाणे सुरु झालेही आणि यास आय.एस.ओ. मानांकन देखील मिळाले. परंतु; येथील उपविभागीय कार्यालयास मात्र जुन्या जागेतुन नविन इमारतीत स्थलांतरास अजुनही मुहुर्त सापडलेला नाही. यामुळे कार्यालयाची सर्व सोयींयुक्त सुसज्ज अशी कार्यालयाची इमारत मागील तीन महिन्यांपासून धुळखात पडली आहे.
यातच उपविभागीय अधिकारी पदाचा चार्ज हा सारखा याच्याकडुन त्याच्याकडे जात नसल्याने कार्यालयाच्या कामात सुसुत्रता नाही. याचा फटका थेट सर्वसामान्य नागरीकांना बसत असत आहे. ग्रामिण पोलीस ठाण्यातील कामासाठी आलेल्या नागरिकांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात यावे लागल्यास तिन किलोमिटरची रपेट मारीत शहरात यावे लागते. यामुळे इमारत तयार असून यात कार्यालयाची सुरुवात का होत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.