बीड : येथील पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन ‘व्हिप’ने गोंधळ उडाला होता. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे व जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी स्वतंत्र ‘व्हिप’ बजावले होते. दोन सदस्यांनी डॉ. क्षीरसागर यांच्याच ‘व्हिप’प्रमाणे शिवसंग्राम- सेनेच्या तालुका विकास आघाडीला सहकार्य केले. मात्र, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या संदीप क्षीरसागरांच्या काकू- नाना आघाडीला थेट प्रदेश कार्यालयानेच रसद पुरविल्याने राकॉतील निष्ठावंत कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे.१६ सदस्यांच्या बीड पंचायत समितीत कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. राष्ट्रवादीकडे अवघे दोन सदस्य असल्याने त्यांना सत्तास्थापनेची संधी कमीच होती. दुसरीकडे काकू- नाना आघाडीचे सहा सदस्य निवडून आले होते. शिवसंग्राम व शिवसेनेने एकत्रित येऊन तालुका विकास आघाडी स्थापन केली. भाजपचा एक सदस्य त्यांना मिळाला. त्यामुळे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी बंडखोर पुतण्याला सहकार्य करण्याऐवजी शिवसंग्राम व शिवसेना या पारंपरिक शत्रूंसोबत हातमिळवणी केली. १२ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना ‘व्हिप’ काढून तालुका विकास आघाडीला मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी स्वत:च्या स्वाक्षरीसह दोन सदस्यांना ‘व्हिप’ बजावला. त्यात बीड पंचायत समितीतील मतदानाच्या निर्णयाचा अधिकार काकू- नाना आघाडीचे प्रमुख संदीप क्षीरसागर यांना देण्यात येत आहेत, असे म्हटले होते. दोन्ही सदस्यांनी गर्जे यांचा ‘व्हिप’ धुडकावून डॉ. क्षीरसागर यांच्या ‘व्हिप’नुसार मतदानाचा हक्क बजावला. मात्र, काकू- नाना आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका व जि.प. -पं.स. निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी वेगळी चूल मांडली. पक्षविरोधी भूमिकेबद्दल संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पक्षाने त्यांना उघडपणे रसद पुरविल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गर्जेंच्या ‘व्हिप’मुळे संदीप क्षीरसागर यांच्या मागे पक्षातील काही मंडळी उभी असून आ. जयदत्त क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्याचा डाव असल्याचेही उघड झाले आहे. जि.प., पं.स. निवडणुकीत पक्षाचे काम निष्ठने करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत यामुळे नाराजी पसरली आहे. यासंदर्भात श्रेष्ठींनी शिवाजीराव गर्जे यांना जाब विचारायला हवा अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)
गर्जेंच्या ‘व्हिप’ने निष्ठावंतात अस्वस्थता
By admin | Published: March 17, 2017 12:18 AM