गेवराई
: काका, मामा, मावशी कोणाला ताप येतो का? खोकला आहे का? सर्दी, पडसं नाही ना, असे प्रश्न विचारत पाहू द्या तुमचे बोट, असे म्हणत बोटाला ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजन पातळी तपासण्याचे व नोंद घेण्याचे काम गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी करीत आहेत.
गेवराई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता घरोघरी जाऊन आजाराबाबत माहिती घेण्यासाठी झीरो डेथ मशीन मोहीम सुरू आहे. गेवराई तालुक्यातील सुमारे शिक्षक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात महिला शिक्षकांचाही समावेश आहे. ऑक्सिजन मापक यंत्र घेऊन नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांसह अन्य कर्मचारी थेट बांधावर जाऊन नागरिकांशी संवाद करीत आहेत. तहसीलदार सचिन खाडे, गट विकास अधिकारी अनुरुद्र सानप, गटशिक्षणाधिकारी मिलिंद तुरुकमारे, तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम यांच्या नियोजनातून ही मोहीम सुरू आहे.
कोरोनाचा धसका आता सर्वांनीच घेतला असल्याने मोहिमेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना आता नागरिकांकडूनही प्रतिसाद दिला जात असल्याचे दिसत आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उन्हातान्हात शेतात राबत आहेत. तर घर बंद असल्याने शेतावर बांधावर जाऊन माहिती घेत आणि तपासणी केली जात आहे. झीरो डेथ मिशन सर्वेक्षण १० मेपर्यंत तीन टप्प्यांमध्ये असून अंतिम गोषवारा १० मेपर्यंत तयार होईल, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले जात आहे.
कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनीच गांभीर्य ठेवले पाहिजे. काही दिवस तरी हा सामूहिक लढा लढावा लागणार असून त्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. नागरिकांनी नियमावलीचे उल्लंघन करू नये.
-संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी, गेवराई.