- नितीन कांबळे कडा- तुझ्या आई, बापाला जिवे मारीन, अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील एका गावात घडल्याचे उघडकीस आली आहे. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी गेल्यावर या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेला वाचा फुटली. पिडीत मुलगी सात महिन्याची गर्भवती असून या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय तरूणाचे लग्न झाले होते. पण पत्नी नांदत नसल्याने तो मोठ्या भावाकडे राहत होता. जानेवारी महिन्यात चुलत्याची नियत फिरली. घरी कोणी नसल्याची संधी साधून तुझ्या आई,बापाला जिवे मारीन अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला. तेव्हापासून मुलगी भयभीत होऊन घाबरुन घरात राहत होती. पण रविवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने आई,वडिल तिला अहमदनगर येथील रूग्णालयात घेऊन गेले. येथील डाॅक्टरांनी तपासणी केल्यावर मुलगी गर्भवती असून तिला सात वा महिना असल्याचे सांगताच आई, वडिलाच्या पायाखालची वाळू सरकली.
विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने घडलेल्या घटनेचा उलगडा केला. रविवारी रात्री हा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात झिरो एफआयआरने दाखल करण्यात आला होता. मंगळवारी अंभोरा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चुलता फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथक प्रभारी प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी ,पोलीस हवालदार मुद्दहर शेख करीत आहेत.