पंपाला वीज मिळेना
अंबाजोगाई: ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगाम जोरदार सुरू आहे. सर्वच पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना आठ तास वीज पुरवठा दिला जातो. मात्र, दिला जाणारा वीज पुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
वाळू उपसा थांबवा
बीड : गेवराई तालुक्यातील नदीकाठच्या गावातून होणाऱ्या वाळू उपशावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत. तरीही तालुक्यातील गंगावाडी-राजापूर येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
गुरांना उपचार मिळेनात
चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात, मात्र त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अनेकवेळा उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी होत आहे.
अवैध धंदे वाढले
बीड : काही दिवसांपूर्वी बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु आहेत. हॉटेल, पान टपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरित्या दारुची विक्री होते. याकडे मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यांची दुर्दशा
सिरसाळा : येथील जिनिंगच्या पाठीमागील परिसरात खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना, वाहनधारकांना कसरत करतच रस्ता पार करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. तरीही अद्याप या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.