वीजतारांचा धोका
माजलगाव : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीजतारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. ही रखडलेली कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वाहतूक कोंडीची वाढती समस्या
अंबाजोगाई : शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यशवंतराव चव्हाण चौक हा मोरेवाडी परिसरात येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे. अशी स्थिती असतानाही या परिसरात अनेक वाहने रस्त्यावर लावली जातात. रस्त्याचे सुरू असणारे काम व रस्त्यात पार्किंग केलेली वाहने यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होते.
ओट्यांविना असुविधा
अंबाजोगाई : कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने दर मंगळवारी आठवडी बाजार समितीच्या प्रांगणात व मोंढा परिसरात भरतो. अजूनही अनेक भाजीविक्रेते यांना बसण्यासाठी ओटे नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला जमिनीवर बसून विकावा लागतो. स्वच्छता नसल्याने दुर्गंधीही सहन करावी लागते.