रेंज मिळत नसल्याने ग्रामीण ग्राहक वैतागले
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागांत काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएलची लाइन बिघडल्याने इतर कंपन्यांच्या टॉवरची रेंज मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महत्त्वपूर्ण कामे खोळंबत असल्याने ग्राहक वैतागलेले दिसून येत आहेत.
रानडुकरांची धास्ती; बंदोबस्ताची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, तसेच रानडुकरांच्या हल्ल्याची शेतकऱ्यांना भीती वाटते. वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
गस्त घालण्यासह बंदोबस्ताची मागणी
वडवणी : वडवणी पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे व दरोड्याचे प्रमाण मागील काही महिन्यांत वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री गस्त वाढविण्याची मागणी होत असून, दाखल गुन्ह्यांचा छडा तातडीने लावावा व चोरट्यांना ताब्यात घेण्याची मागणी होत आहे.
पालिकेकडे अपुरा कर्मचारी वर्ग
अंबाजोगाई : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना पुरेशा सुविधा देण्यासाठी पालिकेकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. परिणामी, शहरातील विविध भागांत नागरी समस्या वाढत आहेत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर कामे करण्याचे आदेश द्यावेत व तात्काळ उपायांची मागणी आहे.
कड्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
कडा : शहरातील विविध रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. ही कुत्री टोळके करून रस्त्यावर बसत आहेत. ये- जा करणाऱ्या नागरिकांसह दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून येत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.