अजित कुंभार : महास्वच्छता अभियानात जि.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान
बीड : सुदढ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता जेवढी गरजेचे आहे, तितकीच आपल्या स्वतःच्या कार्यालयातील स्वच्छता महत्त्वाची आहे. आपले कार्यालय आपले घर आहे, असे समजून कार्यालयाची स्वच्छता रोजच्या रोज नियमित प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले. जिल्हा परिषदेच्या महास्वच्छता अभियानाच्या श्रमदान उपक्रमात ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, प्रदीप काकडे, कार्यकारी अभियंता हळीकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. कार्यालयात व इतर ठिकाणी कर्मचारी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करीत आहेत. मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात धुणे या बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत, ही अतिशय चांगली बाब आहे; परंतु वैयक्तिक स्वच्छतेसोबतच कार्यालयातील स्वच्छता ठेवणेही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले घर समजून कार्यालयाची स्वच्छता ठेवण्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. ही स्वच्छता नियमित होईल, असेही ते म्हणाले.
विभागप्रमुखांनी लक्ष द्यावे
कागद व इतर कचरा एकत्रित ठेवण्यासाठी करण्यासाठी छोट्या कचऱ्याच्या बकेट वापराव्यात रोजच्या रोज हा कचरा एकत्रित करून त्याचे व्यवस्थापन करावे. कर्मचारी कार्यालयीन स्वच्छतेचा अंगीकार करत आहेत की नाही, या बाबीकडे विभागप्रमुखांनी लक्ष देण्याचे गरज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी म्हणाले.
पावणेदोन तास श्रमदान
जिल्हा परिषदेच्या परिसरात उगवलेल्या गवतामुळे तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिसर अस्वच्छ झाला होता. एकाच वेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महास्वच्छता अभियानाचा उपक्रम घेतला. बुधवारी सकाळी पावणे सात ते साडेआठ या वेळेत श्रमदानासाठी कुदळ, फावडे, घमेले घेऊन जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.