बीड : भूखे को भोजन, प्यासे को पानी ही संस्कृती आणि सेवाभावाचा धर्म जपत येथील रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊन तसेच परवानानगर भागातील एसबीआय कॉलनीतील रहिवाशांनी गरीब, निराधार वृद्धांसाठी अन्नछत्र उपक्रम सुरु केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी ‘दत्त प्रसादालया’चे उद्घाटन रोटरी क्लबचे डीजीएन सुहास वैद्य (औरंगाबाद), एजी संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुहास वैद्य यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमांची माहिती दिली. जगभरात रोटरी क्लबचे सदस्य विविध सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. बीडमध्ये वंचितांसाठी मोफत अन्नछत्राचा उपक्रम स्तुत्य असून, यासाठी पुढे आलेले हात आणि या वंचितांना दररोज डबा पोहच करणारे हात ही मानवतेची पावती असल्याचे ते म्हणाले.यावेळी संतोष पवार, माजी उपप्रांतपाल गिरीश क्षीरसागर यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष अतुल संघाणी व सचिव आदेश नहार यांनी या कायमस्वरुपी अन्नछत्र उपक्रमाची उभारणी कशी करण्यात आली याची माहिती दिली.
समाजातील वंचितांना, भूकेल्यांना आपल्यातील खारीएवढा वाटा उपलब्ध करुन त्यांच्याचेह-यांवर हसू फुलविण्याचे काम या उपक्रमातून होणार असून, यात दानशुरांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, तसेच वाढदिवस व इतर कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून या सामाजिक यज्ञात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रकल्पाची संकल्पना रोटरी सदस्य राजेश बंब यांनी मांडल्यानंतर त्यांना क्लबच्या सर्व पदाधिकाºयांनी दाद दिली व उत्स्फूर्तपणे या अन्नछत्र उभारणीला अनेकांचे हात लागले. अध्यक्ष संघाणी, सचिव नहार, उपप्रांतपाल सूर्यकांत महाजन, दिनेश लोळगे, गिरीश क्षीरसागर, प्रल्हाद कराळे, अतुल कोटेचा आदींनी पुढाकार घेतला. परवानानगर येथील रहिवाशांच्या सहकार्याने निवृत्त बँक अधिकारी शिवशंकर कोरे यांनी अन्नछत्रासाठी स्वयंपाकघराला जागा व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या. गुरुवारी या उपक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ सुरुवात झाली. सूत्रसंचालन नितीन गोपन यांनी केले.