गुरांना उपचार मिळेनात
चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात. मात्र, त्याठिकाणी अनेक वेळा पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी केली जात आहे. परंतु अद्याप याकडे लक्ष देण्यात आलेले नाही.
गतिरोधकाची गरज
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे. परंतु अद्याप याकडे दुर्लक्ष होत आहे.
रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीला गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
कारवाईची मागणी
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.