मोठेवाडीत अनोखा आनंदोत्सव
गंगामसला (ता. माजलगाव) : माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रासवे कुटुंबीयांनी आपल्या कन्यारत्नाचे स्वागत गावात मिरवणूक काढून, दीड क्विंटल जिलेबी घरोघरी वाटून, ढोल, ताशे, हलगी वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, धूमधडाक्यात केले. शिवाय शेतात नारळाच्या झाडाचे रोपण करून समाजोपयोगी उपक्रम राबवून अनोखे स्वागत केले.
मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरकडून होणारा छळ, नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी ऐकतो, पाहतो; पण सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत असल्याने समाधानाचे वातावरण आहे. मोठेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी अशोक नाथाराव रासवे आणि पत्नी सारिका या दाम्पत्याला मुलगी झाली. या कन्यारत्नाचे त्यांनी अनोखे स्वागत केले. यावेळी सरपंच अविनाश गोंडे, मा. सरपंच विष्णू खेत्री, दत्तात्रय चव्हाण, शिवकुमार माने, रंजीत जोगडे, जगन खेत्री, रामकृष्ण रोकडे, धैर्यशील गोंडे, हनुमान सर्जे, चक्रधर हिवरकर, गंगाधर रासवे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. स्त्री जन्माचे स्वागत घरोघरी व्हावे, तरच स्त्री व पुरुषांच्या संख्येतील तफावत कमी होईल, अशोक रासवे व त्यांच्या कुटुंबीयांनी राबविलेल्या उपक्रमातून इतरांना प्रेरणा मिळेल, असे सरपंच अविनाश गोंडे म्हणाले.