बीड : पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथील जि. प. शाळेतील पोषण आहार, ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीचे हंगामी वसतिगृहाच्या निधीचा गैरव्यवहार तसेच घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने आज दुपारी जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनात मुलांच्या खेळातील नोटा उधळल्या. हे अनोखे आंदोलन आज दिवसभर सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले होते.
मागील काही दिवसांपासून पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथील जि. प. शाळेतील पोषण आहार व ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठीचे हंगामी वसतिगृहाच्या निधीमध्ये गैरव्यवहार आहे. तसेच गरजूंना घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात येत होती. मात्र, यावर काही कारवाई झाली नाही. यामुळे आज आक्रमक पवित्रा घेत लोकजनशक्ती पार्टीच्या पदाधिका-यांनी जिल्हा परिषदे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्या दालनाबाहेर व दालनात आंदोलन कर्त्यांनी लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा उधळल्या.
या अनोखा आंदोलनाबद्दल लोजपाचे पाटोदा तालुकाध्यक्ष गोरख झेंड यांनी सांगितले कि,जिल्हा परिषदेकडे चौकशी करायला निधी नसल्याने बच्चों का बॅँकेतील नोटा देण्यात आल्या. या अनोख्या आंदोलनाने जिल्हा परिषदेत काही वेळ गोंधळाची परिस्थिती होती. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना रजनोर नसल्याने त्या आल्यानंतर याप्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले.