बीड : जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मध्ये होणारा ऑक्सिजनचा पुरवठा एका अज्ञात व्यक्तीने ५ मिनिटांसाठी बंद केला होता. परंतु तो तत्काळ सुरू करण्यात आला. ऑक्सिजन न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. परंतु नातेवाइकांनी तशी कोठेही लेखी तक्रार केलेली नाही. तर तसा काही प्रकार घडला नसून पुरवठा सुरळीत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. दरम्यान, या प्रकरणाने सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या ऑक्सिजनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्रशासन धावपळ करीत आहे. यातच काही लाेक खोडसाळपणा करीत आहेत. असाच प्रकार शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. वॉर्ड क्रमांक ७ मध्ये पुरवठा होणारा ऑक्सिजन अचानक अज्ञात व्यक्तीने बंद केला. परंतु येथील तंत्रज्ञाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने तो सुरू केला. त्यानंतर पहाटेपर्यंत याच वॉर्डमधील दोघांचा मृत्यू झाला. हा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याची चर्चा सर्वत्र झाली. परंतु नातेवाइकांनी तशी लेखी तक्रार कोठेही केलेली नव्हती. घटना समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी रुग्णालयात धाव घेत घटनेचा आढावा घेतला. तसेच घाबरलेल्या लोकांना आधार दिला.
दरम्यान, याचा खुलासा करताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड म्हणाले, ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता हे खरे आहे. परंतु कोणाचाही मृत्यू ऑक्सिजनअभावी झालेला नाही. जे दोन मृत्यू झाले, त्यांची प्रकृती अगोदरच चिंताजनक होती. एकाला व्हेंटिलेटर होते तर दुसरा बायपॅपवर होता. दोघांचाही एचआरसीटी स्कोअर १९ पेक्षा जास्त होता. ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू पहाटे २ वाजता तर ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ६ वाजता झाला आहे.
सुरक्षा वाढविली
जिल्हा रुग्णालयात जवळपास पाच ठिकाणांहून ऑक्सिजन पुरवठा होत आहे. अगोदर या ठिकाणी एक तंत्रज्ञ होता. आता आणखी ८ लोक येथे वाढविण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या आहेत.