अंबाजोगाई : शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील समुदायाने बुधवारी कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.गरीब लोकांना अंबाजोगाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे, जॉब कार्ड, मजुरांना काम द्यावे व अन्न सुरक्षा देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी येथील जातीअंत संघर्ष समिती, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. परंतु प्रशासन या बाबत उदासीन दिसत असल्याने पोटभरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. या बाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासनाला निवेदन दिले होते.त्यानुसार बुधवारी शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो स्त्री-पुरूष, वयोवृद्ध नागरिक व लहान मुले, सर्वसामान्य गरीब लोक हे रणरणत्या उन्हात बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. तरी या प्रश्नी प्रशासनाने या लोकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व झालेल्या परिणामांना शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी दिला आहे.शासकीय जमिनीवर बेघरांना ‘सर्वांसाठी घरे‘ योजनेतून घरे मिळावीत तसेच त्यांना जॉबकार्ड मिळावे, मजुरांना काम द्या, अन्न सुरक्षा योजनेत या बेघर व वंचित कुटुंबांचा समावेश करून त्यांना शिधापत्रिका मिळाव्यात व स्वस्त धान्य मिळाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलन स्थळी पुनमसिंग टाक, गोरखसिंग भोंड, हिंमतसिंग जुन्नी, विरसिंग टाक, अशोक ढवारे, आशाबाई जोगदंड, छायाबाई तरकसे, विशाल शिंदे, अनिल ओव्हाळ, मीरा जोगदंड, छाया गायकवाड, अलका जोगदंड, रत्नमाला परदेशी या सहीत सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शिकलकरी समाज, मिलींदनगर व येल्डा रोड परिसरातील शेकडो बेघर कुटुंबे,वंचित समाज बांधव हे बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत.विविध निवेदने, अर्ज, विनंत्या, मोर्चा काढूनही या प्रश्नी न्याय मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
अंबाजोगाईत बेघर मजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:39 AM
शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील समुदायाने बुधवारी कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.
ठळक मुद्देउपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन : कायमचे घर, जॉबकार्ड, काम देण्याची मागणी