अंबाजोगाई (बीड ) : मोबाईल फोन देण्याच्या बहाण्याने दुकान मालकाने एका अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदरील दुकानदारावर गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सदरील गतिमंद अल्पवयीन पिडीत मुलगा १७ वर्षीय असून तो शहरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. दररोज शाळा संपल्यानंतर तो घराबाहेर मित्रांसोबत खेळत असतो. दि. १६ जून रोजी दुपारी २ ते ४ वाजताच्या दरम्यान तो खेळत असताना शेख मुदस्सीर शेख इस्माईल या मोबाईल दुकानदाराने पिडीत मुलाला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून दुकानात बोलून घेतले. तो दुकानात येताच त्याने दरवाजा बंद करून त्याच्यावर तीन वेळेस अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेबाबत मित्राकडून माहिती मिळाल्यानंतर पिडीत मुलाच्या मोठ्या भावाने दि. २० रोजी वडील आणि भावाला सोबत घेऊन शेख मुदस्सीर याच्या दुकानात जाऊन जाब विचारला. त्यानंतर तो दुकान बंद करून फरार झाला होता. याप्रकरणी पिडीत मुलाच्या भावाच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात शेख मुदस्सीर याच्यावर पोक्सो आणि अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत. या घृणास्पद प्रकाराने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांची पोलीस कोठडी :दरम्यान, मंगळवारी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने रात्री आरोपी शेख मुदस्सीर याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.