- मधुकर सिरसटकेज: केज-कळंब राष्ट्रीय महामार्गावरील सुर्डी शिवारात उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकी धडकल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पांडूरंग भिमराव भालेकर (वय 43 रा. तांदूळवाडी ता कळंब) व विठ्ठल उत्तम कस्पटे (वय 40 रा. इटकूर ता कळंब) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग भालेकर आणि विठ्ठल कस्पटे हे दोघे नात्याने मेव्हणे आहेत. गुरुवारी दुपारी दोघेही कामानिमित्त केज तालुक्यात आले होते. रात्रीच्या सुमारास एकाच दुचाकीवरून दोघेही कळंब मार्गे आपल्या गावी परतत होते. दरम्यान, सुर्डी फाट्याजवळ ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या वेगाचा अंधारात अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी ट्रॉलीला पाठीमागून धडकली. धडक जोरदार असल्याने दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन फरार झाला. माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोनि योगेश उबाळे आणि जमादार खेडकर यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला.