गेवराई : तालुक्यातून विविध कामांसाठी येथील तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंग तसेच ठिय्या मांडून बसलेल्या मोकाट जनावरांना सामोरे जावे लागत आहे.
उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारासह विविध महसूलसंबंधित कामासाठी येणारे नागरिक तहसील कार्यालयाच्या गेटच्या आत अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने लावतात. त्यामुळे पायी जाणाऱ्यांना त्रास होतो. याच परिसरात दररोज मोकाट जनावरांचा ठिय्या देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या ठिकाणी गेटवर साधा कोतवाल किंवा शिपाईदेखील उपस्थित नसल्याने वाहन पार्किंगबाबत बेशिस्तपणा वाढला आहे. वाहने आणि जनावरांचा अडथळा दूर करून नागरिकांना कार्यालयात जावे लागत आहे. तहसीलदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष न करता तहसील कार्यालयाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, जयसिंग माने, शेख मोहसिन यांनी केली आहे.