- सोमनाथ खताळ बीड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बीड जिल्ह्यातील तिघांनी घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याची मान उंचावली आहे. शिरूरचे शुभम नागरगोजे, परळीचे यशवंत मुंडे आणि अंबाजोगाईचे डॉ.किशोरकुमार देवरवाडे अशी या यशस्वी झालेल्या त्रिमुर्तींची नावे आहेत. परळीच्या यशवंत मुंडेचा देशात ५०२ वा क्रमांकपरळी येथील यशवंत अभिमन्यू मुंडे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशात ५०२ वा क्रमांक पटकावला आहे. यशवंतचे प्राथमिक शिक्षण जगमित्र नागा विद्यालय परळी व माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल, तर उच्च माध्यमिक शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथे झाले आहे. मागील दोन वर्षांपासून पुण्यामध्ये स्वयंअध्ययनावर भर देऊन घरीच अभ्यास करून त्याने युपीएसएसी परीक्षेत यश संपादन केले आहे. जगमित्र नागा विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक ए. पी. मुंडे यांचा तो मुलगा आहे. त्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
अंबाजोगाईच्या किशोरकुमारचा देशात ७३५ वा क्रमांकअंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील डॉ.किशोरकुमार अशोकराव देवरवाडे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात ७३५ वा क्रमांक पटकावला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण माजलगाव व त्यानंतरचे शिक्षण अंबाजोगाई, लातूर आणि सोलापूरला झाले. एकवेळा मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नौकरीही लागली. परंतू जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने ती सोडून युपीएससीचा अभ्यास केला. अखेर यात त्याला यश आले. डाॅ.किशोरकुमारचे वडील राज्य परिवहन महामंडळात यांत्रीकी विभागात कर्मचारी आहेत. त्याच्या या यशाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.शिरूरच्या शुभमचा यूपीएससीत देशात ४५३ वा क्रमांकशिरूर तालुक्यातील वारणी येथील रहिवासी असलेल्या शुभम नागरगोजे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. देशातून ४५३ वा क्रमांक त्याने पटकावला आहे. शुभमने औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (विद्युत) पदवी मिळवलेली आहे. शुभमचे वडील भाऊसाहेब हे बीडच्या जिल्हा परिषदेत शाखा अभियंता आहेत. तसेच आई उषा या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत. शुभम अभ्यासाबरोबरच खेळातही अग्रेसर असतो. बॅडमिंटन, तायक्वांदो स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. आदिवासी भागातील मेळघाटातही त्याने काम केले आहे. डॉ.पद्माकर घुले व विवेक घुले हे शुभमचे मामा असून, डाॅ. भास्कर नागरगोजे व भीमसेन नागरगाेजे हे काका आहेत. त्याच्या यशाचे क्रीडा विभागाच्या उपसंचालक ऊर्मिला मोराळे, विठ्ठल बारगजे आदींनी स्वागत केले आहे.