केज : तालुक्यातील आडस येथील नेहा किर्दकने युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशातून ३८३ रँक मिळवत यश मिळवले आहे. आडसमधून युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होणारी नेहा पहिलीच कन्या ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नेहा लक्ष्मण किर्दक हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण औरंगाबाद शहरातील शारदा विद्यामंदिर कन्या प्रशाला तर महाविद्यालयीन शिक्षण देवगीरी महाविद्यालयात झाले. शिक्षणात सतत विशेषप्राविण्याने उत्तीर्ण होत असलेल्या नेहाने औरंगाबाद येथीलच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून एमबीबीएसची पदवी घेतली. याच दरम्यान तिने युपीएससी तयारी सुरु केली. वडिलांनीसुद्धा स्वतःचे खाजगी शिकवणी वर्ग बंद करून मुलीच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले.
आई-वडिलांचे व गुरूजनांचे मार्गदर्शन, ध्येय समोर ठेवून केलेला सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे हे यश मिळाले. तसेच वडिलांचे अधिकारी होण्याचे अधूरे राहिलेले स्वप्न मी साकार केल्याचा अधिक आनंद होत असल्याचे नेहाने सांगितले.