कडा : वाळू माफियांनी तस्करीसाठी आता बोटींचा वापर सुरु केला असल्याचे निमगांव बोडखा परिसरात उघडकीस आले आहे. चोरट्या मार्गाने उपसा करून वाळूची बोटीच्या माध्यमातून तस्करी करत असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली. यानंतर त्यांनी अंभोरा पोलिसांच्या मदतीने कारवाई करत साडेसात लाख रूपयाचे साहित्य जप्त केले.
आष्टी तालुक्यातील निमगांव बोडखा परिसरात दोन बोटीच्या माध्यमातून सिना पात्रातुन वाळु उपसा होत असल्याचे तहसीलदार यांना समजताच त्यांनी अंभोरा पोलिसांच्या मदतीने सोमवारी सायकाळच्या सुमारास कारवाई केली. यावेळी दोन बोटी व इतर साहित्य असे 7 लाख 41 हजार रूपयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या पथकाने केली.